एमआयडीसी अन् बंद पडलेलं वर्तमान..!
मला जर कुणी म्हंटले चलतो मॉलमध्ये फिरायला जाऊ तर मला ते आवडत नाही,मी एमआयडीसीमध्ये फिरायला जातो नेहमी, रिकामा असलोकी तिकडच भटकत असतो.प्रत्येक कंपनीचे बाहेरून निरीक्षण करत फिरत असतो जे करायला मला खुप आवडते...
नेहमी प्रमाणे तो दिवस पेपर झाला,घरी जायला खुप वेळ होता म्हणुन मी काहीतरी नवीन माहिती भेटल म्हणुन एमआयडीसी एरियात फिरायला गेलो साधारण तीन महीन्यांपुर्वीची ही गोष्ट असेल...
मी रस्त्याने भटकत होतो इकडेतिकडे कावरी-बावरी नजर टाकत,आजू-बाजूला चालू असलेले संवाद ऐकत.आज का कुणास ठाऊक पण मला इथे खुप भयाण शांतशांत वाटत होते....
जिथे नेहमी वरदळ असते कंपन्यांमधला यंत्रांचा आवाज,भोंग्यांचा आवाजही आज ऐकु येत नव्हता.मी चालत-चालत बराच पुढे आलो,तशी ती शांतता अजुन वाढत गेली,पुढे रस्त्याने एक चिटपाखरू सुद्धा दिसेनासे झाले....
नेहमी आवडणारे दृश्य आता मला भीतीदायक वाटु लागले होते,उंचउंच इमारती त्यांना कांग्रेसच्या जंगलाने वेढले होते.आतमध्ये पूर्ण काळोख नजरेस पडत होता.कंपनीचा मरलेल्या माणसाचा जसा सापळा व्हावा तसा भास होत होता....
ज्या कंपनीत हजारो माणसे काम करत होते,ती आज जीव गेल्यासारखी शांत उभी होती.म्हणजे ती बंद पडली होती,हजारो गरीब लोकांचे पोट भरणारी ती कंपनी कायमची देशात आलेल्या मंदीच्या सावटात सापडुन बंद पडली होती...
मला हे बघुन राहावले नाही मी त्या मार्गाने आत काय चालु असेल कसे असेल,या ईर्षेने बघण्यासाठी तिकडे सरसावलो.गेटवर येताच एक पन्नाशीतले काका मला बघुन त्यांच्याकडे येण्यासाठी खुणावु लागले,मी गेलो अन् त्यांना या प्रकाराबद्दल विचारले....
जे अंदाज केले होते ते खरे झाले होते,मंदीच्या सावटात ही कंपनी सुध्दा बंद पडली होती इतर कंपन्यां प्रमाणेच.जी हजारो लोकांना रोजगार देत होती ती आज फक्त या सहा शिपाई लोकांना रोजगार देण्यास ही सफल ठरत नव्हती...
कंपनीचा मालकाने हताश होऊन इकडे येणे ही बंद केले होते.व त्याच्या इतर कंपन्या ज्यासुद्धा बंद पडेल या अवस्थेत होत्या त्यांना तो सावरत होता,हे सांगताना त्या काकांना राहवले नाही व नकळत त्यांच्या डोळ्यातुन अश्रु येत गेले....
त्यांच्याकडे बघुन मनात एक विचार येऊन गेला मी जे स्वप्न या एमआयडीसीमध्ये काम करण्याचे बघितले होते,ते मावळले होते की काय.मी मनातच खजील होऊन स्वत:ला सावरत राहीलो, पुढे खुप वेळ त्यांच्याशी बोलत राहिलो....
त्यांनी आत जाऊन मला कंपनी दाखवली आतमध्ये सर्वत्र जाळे पसरलेले,उंच उंच असलेले ते काळे पत्र,तो कायमचा बंद पडलेला कंपनीचा भोंगा मला खुणावू लागला होता....
मधल्या परीसरात दोन-तीन म्हाताऱ्या त्याकंपनीच्या परिसरात वाढलेल्या गवतास निंदत होत्या.त्यामात्र यामुळे खुश होत्या,कारण त्यांना कुठेतरी रोजगार भेटला होता.पण इतक्या लोकांचं पोट कसे भरणार आता,जे या कंपनीवर अवलंबुन होती,ही काळजी त्यांनाही वाटत होती....
केव्हापासुन त्या या विषयावर बोलत होत्या मला बघुन त्यांनी सावरले,त्यांना वाटले कुणी साहेबच आला की काय.त्या माऊलींना कुठे माहीत होते मी सुद्धा या मंदीच्या काळात भरडला जाणारा एक सुशिक्षित बेरोजगार होतो.मी त्यांच्या नजरेला चोरत काकांचा निरोप घेतला व चालता झालो....
पुढे रोडवर एक टपरी दिसली सकाळी काम करायला येणारे मुले जे घरून एक वेळचे जेवण आणु शकत नसायचे,ते येथे नाश्ता करून कंपनीत काम करत असायचे.पण गेल्या काही दिवसांपासुन त्या टपरीवरही कुणी फिरकले नव्हते ,एक बाई होती फक्त टपरीवर.चुलीवर केव्हा पासून चहा ठेवला होता,काय माहीत उकळून उकळून तो पूर्ण घट्ट झाला होता....
मी चहा घेत त्याबाईला परिस्थिती बद्दल विचारले, तसे ती बाई बोलती झाली आयुष्यातले सर्वात वाईट दिवस जगु लागलो आहोत इतकंच ती एका वाक्यात बोलली.नवरापण हल्ली बेरोजगारी मुळे परेशान होऊन दारू पिऊन भटकत असतो,ती सांगत होती.मला राहवले नाही चहा घेऊन पैसे देऊन उर्वरित पैसे वापस न घेता मी तिथून निघून गेलो....
थेट एमआयडीसीच्या चौकात येऊन दृष्य बघत बसलो,आधीचे दृश्य बघून मी पुर्णपणे आतुन थकलो होतो.त्राण राहीला नव्हताच शरीरात चौकात माझ्यासारखी ते तरुण बेरोजगार मुलं बघुन त्रास होत होता.बिचारी कामाच्या शोधात वणवण करत भटकत होती,कुणी आता हळूहळू नशेच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा हळू हळू संपवित होती....
कारण मंदीचे वादळ त्यांच्या जीवनात येऊन त्यांचे सुख त्यांच्यापासुन हिरावुन घेऊन गेलं होतं,ती तरुण मुलं मात्र कायमची हवालदिल झाली होती....
अन्... मी भटकत होतो,भटकत होतो....
#एम_आय_डी_सी_कामगार_अन_बंद_पडलेलं_वर्तमान....
लेखन:भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
(कन्नड जि औरंगाबाद).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा