कॅनव्हास तुझ्या संगतीने..!
कुंचल्यात कुंचल्यास तू रंगावत राहिली,
झाली जेव्हा एक कुंचल्याची प्रतिमा पूर्ण,
तेव्हा मात्र बदनाम मी झालो..!
कुणाला कसली ओढ तर कुणाला कसली,कुणाला वेळ साधायला आवडते तर कुणाला वेळेनुसार आपलं बदलणं.सांजेचा सूर्य अस्ताला जाण्याच्या काही दहा-पंधरा मिनिटांची ती घटिका अन् ती वेळ तुला साधायला आवडायची...
अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जसे-जसे मावळतीला जावं,तसं त्या काही मिनिटांत तुझं स्केच बोर्डवर तयार होणारं ते चित्र मी बघत राहावं...
आयुष्यातलं सर्वात सुंदर दृष्य कुठलं असावं तर हेच,तू तुझ्या डोळ्यांवर येणाऱ्या बटांना ब्रश हातात धरलेल्या हातांनी अलगत सावरावं जसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याने प्रकाशातील सर्व वस्तूंना सावरत आपल्या कवेत घ्यावं...
चित्रात तुझं तल्लीन होणं,लीलया अलवारपणे स्केच बोर्डवर फिरणारा तुझा हात,कल्पनेतील रंगात माखलेला तुझा चेहरा हे सर्व खूप सुंदर आहे...बाहेर अस्ताला जाणारा सूर्य त्याची विविध रूपे दाखवत असतो सोबतीला अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर क्षणाक्षणाला तयार होणारं तुझं हे स्केच...
तुझी दुनिया न्यारीच होती,तुला नको होता कुणी जवळचा हवासा वाटणारा मित्र किंवा मैत्रीण.तुझी दुनिया तू कुंचल्यातून शोधायची,तुला नसायचं भान जेव्हा कुंचल्यात तुझं हरवून जाणं व्हायचं तासंतास.
जसं मला वेळेनुसार बदलणं अन् तुला मात्र तुझ्या विश्वात रममाण राहणं इतकच आवडायचं...
तुझं रोजचं ठरलेलं ते ठरल्या वेळेत पूर्ण होणार एक-एक स्केच.आजही आठवतं अस्ताला सूर्य गेला की तू ते अधुरे राहिलेलं स्केच तसच सोडून द्यायचीस.आपल्या मनाने त्या स्केचचा अर्थ लावून त्याला बोलतं करायची,तुझ्याशी अन् माझ्याशीसुद्धा...
मी तुझ्या वेडेपणात नवखा असल्यामुळं मी ही कधी हो ला नाही म्हंटले नाही आणि हो ला हो करत राहिलो...
साधारण वर्षभरापूर्वी पुन्हा तुझ्या स्टुडिओमध्ये आलेलो,तेव्हाही अन् आजही स्केचसाठी तुझं वेडेपण तितकंच होतं.तुझ्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर अधुऱ्या राहिलेल्या सर्वच स्केचला कुठेतरी पूर्णत्व आलं असे भासले आज. का..?
याला कारणे नव्हते,कदाचित काही गोष्टी पूर्णत्वास गेल्या असाव्यात आपल्या नात्यात आता...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा