गाव रहाटीचं जगणं..!
आज पुन्हा एकदा,
दै."सकाळ" वृत्तपत्रात "मैफल" या सदरात माझी "गाव रहाटीचं जगणं" ही कथा संपूर्ण "मराठवाडा विभाग" आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
अवघ्या महाराष्ट्रातुन प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात जेव्हा आपला लेख प्रसिद्ध होतो आणि दिवसभर आपल्यावर होणारा फोनचा वर्षाव खास करून (ग्रामीण भाग) हे खूप सुखद आहे.आज संपूर्ण "मराठवाडा विभागातुन" बरेच फोन आलेत.अन् कुठेतरी अजूनही वृत्तपत्र हे आपण माणसे आणि वाचन यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे हे दिसून आलं...
मनस्वी खूप धन्यवाद,
Vikas Deshmukh Sir..!
Sakal Media Group,Aurangabad..!
गाव रहाटीचं जगणं..!
भर दुपारची वेळ,उन्हं डोईवर आलेली होती.घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सद्र्याला समीप होवून,एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून बुंदक्याच्या पांढऱ्या सद्र्यावर कुत्रे मुतल्यागत ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते..!
नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकऱ्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचेवर आपले पाय रोवत,एका हातात असलेल्या उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत अनवाणी पायांनी नदी थडीला असलेल्या रानच्या वाटेनं चालला होता.बकऱ्या उन्हातान्हात आधार झालेल्या बोडक्या बाभळीच्या पाल्याला खात खात मोहम्मदचाच्या मागेमागे चालली होती..!
मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मी आईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसा माळणीचं मडं जळून राख झालं होतं.काल सांच्याला तुळसा माळणीची जीवन मरणाची घट्ट बांधलेली गाठ एकदाची सुटली.अन् इतक्या दिवस जगण्या-मरण्याच्या लढाईत तिच्या चालू असलेल्या संघर्षाला अखेर यश आलं,तिची जन्ममरणाची आयुष्याशी बांधलेली गाठ एकदाची सुटली..!
होय यशच...!
तिच्या जग सोडून जाण्यानं तिला यशच आलं,
कारण १३ वर्षांपुर्वी आलेल्या एका वाहटूळीत तुळसामाळीण सापडली होती,डोक्यावर सरपणाची मोळी होती.वाहटूळ इतकी जोऱ्याची होती की तिचा तोल जाऊन तुळसामाळीण धरणीला पडली अन् वरून तिच्या डोईवर असलेली सरपणाची मोळी तिच्या कंबरड्यात पडली,झालं तिचं कंबर तुटलं..!
तशी गेली १३ वर्षे म्हातारी जी अंथरुणाला खिळली ते तिच्या म्हसणात जाण्या पहूर..!
काल सांच्याला ती तिचा संसार सोडून देव लोकाला निघून गेली,तिच्या दोन लेकांनी म्हातारी मरल्यावरसुद्धा वावराच्या वाटणीवरून पाहुण्या लोकांदेखत भांडणे काढली अन् आपसात भांडूनतंडून तुळसामाळनीच्या मड्याला आगींन डाव दिला.
काल रातभर तुळसा माळीणचे मडे जळून जळून पार राख झालं होतं,म्हातारी पंचतत्वात विलीन झाली होती..!
जळतं मडं अजूनही जळू की विझू करत होतं.उंच उंच आकाशात काळे ढग दिसत होते,नदीच्या कडेला तुळसा माळीनीनी वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने नदडीच्या पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते..!
तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल.हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं पर एक आख्खी रात सरली होती पण ते गाठुडे अजुनही तसेच पडून होते..!
आकाशात उंच-उंच आसमंतांशी एकरूप होवून काळवंडलेले काळे काळे ढग अन् तुळसा माळनीच्या जळलेल्या मड्यातून निघणारा धूर,उन्हाच्या तुटनाऱ्या झळाया.त्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकऱ्याना शिळ फुंकित,त्यांना शिव्या देत हाकरीत चालला होता,त्याचे ते बकऱ्यांना हाकरन्याचे बोल माझ्या कानापर्यंत येत होते...
ओ..! आरे ओ..!
उदर कहाॅं खपरीरे केवढी..!
इदर ईत्ता घास छोडके उदर कहाॅं जारी,
छर छर अय केवढी,केवढीहाॅ..!
माॅ का साला इकतो इत्तीसारी धूप और ये क्या बिचारी बुड्डी का कल श्याम के वख्त इंत्काल हो गया,या मेरे अल्लाह बहोत बुरा हो गया रे..!
मेरे अल्लाह बहोत बुरा हो गया..!
मी कधी त्या जळून राख झालेल्या तुळसा माळणीच्या मड्याकडे बघत होतो तर कधी दूर हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहम्मदचाच्याकडे.त्याच्या बकऱ्या म्हणजे साऱ्या गावाच्या बांड बकऱ्या होत्या असं सारे गाव त्याला म्हणायचं...म्हणूनच त्याला शेताच्या रानाला कुणी बकऱ्या चरूंन द्यायचं नाही,तो बकऱ्याकडे लक्ष देत नाही असंही सारा गांव म्हणायचा.परंतु मोहम्मदचाच्या साऱ्या गावाच्या शिव्या,शाप त्या बकऱ्याला देऊन राखोळीने राखलेल्या बकऱ्या राखत होता ..!
पहाट झाली की आठच्या वख्ताला गावातले रोजंदारीवर जगणारे लोकं आपली एखाद-दोन खपुड्या घेऊन मोहम्मद चाच्याच्या बकऱ्याच्या आखरात घेऊन यायचे,मग मोहम्मदचाच्या महीन्यानं त्या बकऱ्या राखुळी करता राखायला घेऊन त्यांना रानात,डोंगरात,नदीच्या थडीला घेऊन फिरायचा...
गाव धड गाडीवर चालू द्यायचा नाही अन् धड पायी चालू द्यायचा नाही...! ही गावची रित त्याला माहित होती,म्हणून तो बकऱ्या राखुळी करून आपले जीवन सुखाने जगत होता.
काल सांच्याला वारलेल्या तुळसामाळणीची सुद्धा एक पाठ मोहम्मद चाच्याकडे राखुळीला होती,म्हणून तो म्हातारीबद्दल मनोमन बोलत होता पुटपुटत होता,त्याला काल तिच्या लेवकांनी केलेल्या भांडणाचं खूप वाईट वाटलं अन तो तिच्याबद्दल,तिच्या लेवकांबद्दल रस्त्यानं बरतळत चालला होता....
दुपारचे ऊन,तुळसा माळणीची जळून राख झालेले मडे,आसमंतात एकरूप होणारी आगीची धग,बकऱ्यांच्या खुरांचा येणारा आवाज,लाल मातीतून चालतांना बकऱ्यांच्या खुरातून उडणारी लाल माती,बकऱ्या पांदीने पुढे गेल्या की मुताच्या ओघळाचा पांदीने येणारा इसाडा वास,बंद झालेलं देऊळ अन् देवीच्या महुर ठेवलेलं पाच सहा दिवसांपूर्वीच नारळाचं खोबरं असलेला प्रसाद कुरतडत असतांना येणारा उंदराचा आवाज हे सर्व ऐकत,बघत मी देऊळापहूर बसलेलो होतो....
मोहम्मदचाच्या माझ्या दिशेनं येत होता ते मी हेरले,कदाचित त्यानं मला दुरूनच बघितलं असावं.दूरवरूनच मी त्यांच्या नजरेत नजर न घालता माझ्या विश्वात रममान असल्याचं त्याला दाखवलं पण हटकणार नाही तो मोहम्मदचाच्या कसला..!
त्यांनी मला हटकवत माझ्या खांद्यावर हात देऊन मला हिसकावत त्यानं माझी विचारणा केली,
इधर कहाॅ हिंडरारे छोटे सरकार..?
मी अडखळतच उत्तर दिलं..!
कुछ.. कुछ नही चाच्या ओ आयेलता आपने गाव की तुळसाआई मर गयी नहीं क्या,उसकी मौता को आया था..!
अरे बावले तू ठीक तो है ना..!
बुड्डी कल मर गयी और तु कहा आज उसकी मौता निकाल राहा है बावले..!
बुरी गत के बावले..!
काम धाम है क्या नै कुछ भाग साले बुरी गत के..!
इतक्यात काय व्हावं अन् स्मशानातील कुत्रे मोठ्या आवाजात इवळायला लागली,त्यांचा तो एक सुरात इवळायचा आवाज ऐकुन मला धडकी भरली अन् मी वेड्यागत मोहम्मदचाच्याच्या डोळ्यांमध्ये बघु लागलो,काहीतरी झालं आहे पण मला न सांगता त्यांनीही उसनं अवसान घेऊन तिथून निघावं अन् मला म्हणावं,
जा भाग घरकु जा छोटे सरकार..!
अन् मी पिंडरीला पाय लावत अनवाणी पायांनी काट्याकुट्याच्या रस्त्यानं घर जवळ करावं,मोहम्मद चाच्यानं मला सावता बाबांच्या देऊळा पहूर जास्तोवर न्याहाळत रहावं..!
मी घरी आलो अंगाला दरदरून आलेला घाम अन् छातीला भरलेली धडकी,मी खाटीवर अंग पसरून दिलं अन् जे झोपलो तेच सांच्याला माय मळ्यातुन आल्यावर तिनं मला अंगाला हात लावून चाचपुन उठवलं.
अंगात ताप भरला होता,मला खाटीवरुन उठणं होईना झालं होतं,कसातरी मी सावरत उठलो...!
अन् बघतो तर काय..!
मायेनं मोहम्मदचाच्याला एक लोटीत लोटीभरून बकरीचं दुध आणायला लावलं होतं.चाच्या ते माझ्या महूर घेऊन उभा होता अन् माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता,मायनं मला हटकलं अन् खाटीवर झोपायला सांगितलं..!
माय त्या बकरीच्या दुधाला माझ्या अंगाला चोपडत होती,साऱ्या अंगाला त्या बक्रीच्या दुधाचा इसाडा वास येत होता अन् पण ताप काही केल्या कमी होत नव्हता.मी दुपारची घटना आठवून परतीच्या वाटेला लागलेल्या मोहम्मदचाच्याला बघत बसलो होतो,एरवी तो खुप दूरवर निघून गेला होता..!
आता पून्हा मला तुळसामाळीण,तिची पाठ,केवडीला शिव्या हासडत चालणारा मोहम्मदचाच्या शून्यात दिसत होता..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा