अनोखा मुसाफिर..!
दोन-तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद गेलो असतांना रात्री नात्यातील एका भावाच्या फ्लॅटवर थांबलो होतो.मी थांबलो त्याच संध्याकाळी त्याचा दुसरा मित्र जो हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील आहे,तो ही ट्रेनने औरंगाबाद येथे येत होता..!
जो की संपूर्ण देशभरात त्याच्या स्वतःच्या व्यवसायनिमित्त मार्केटिंग अन् सोबतच त्याच्या प्रॉडक्टचे सेल करण्यासाठी फिरत असतो..!
तो स्टेशनवर आल्याचे त्याने आम्हाला कळवले अन् त्याला भाऊ म्हंटला की स्टेशनवर तुला घ्यायला येतो,तर तो नाही बोलला अन् तो स्वतःच भावाच्या फ्लॅटवर आला,इथे तो पहिल्यांदाच येत होता..!
तो आला त्याची माझी यापूर्वी कधी भेट नव्हती,की कधी बोलणे तो माझ्यासाठी संपूर्ण नवा होता...!
मला नवीन माणसांबद्दल नेहमीच जाणून घेण्याची इच्छा असते,त्यामुळं मग त्यांच्या दोघांच्या गप्पात विषेश लक्ष देत मी ही सर्व ऐकत होतो,त्याच्याशी बोलतही होतो,तोही बोलत होता..!
रात्रीचे जेवण झाले अन् आम्ही पुन्हा एकदा गप्पा मारायला लागलो.त्याच्या बोलण्यातून त्याची ओळख होवू लागली होती.चाळीशीत असणारा तो साधारण मित्र त्याच्या आजोबांच्या बाबतीत सांगत होता,ते मूळचे पाकिस्तानमधील परंतु देशाची फाळणी झाली अन् ते भारतात आले.त्यांच्याजवळ अंगावरील कपड्याखेरीच काहीही नव्हते,पुढे खूप मेहनत करून ते भारतात हरियाणा रोहतक येथे स्थिर झाले..!
खूप मेहनत परंतु नशिबी असलेली गरिबी अन् याची असलेली जाणीव त्याच्या बोलण्यातून कळत होतं की आपल्याला काहीही करायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही अन् तिच्याशिवाय काही शक्यही नाही..!
पुढे त्याच्या व्यवसायाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल असे मी त्याला म्हंटले अन् त्याने मला सविस्तर सर्व काही सांगितले..!
तो संपूर्ण भारतात कुठल्याही शहरात टू-व्हीलरचे सुटे पार्टस कंपनीकडून घेऊन ऑटोपार्टसच्या दुकानांना विकत होता,यात तो अन् त्याचा भाऊ हे दोघेही हे काम करायचे.त्याच्या बोलण्यातून कळाले की त्याचा भाऊ या व्यवसाय निमित्त येथे लवकरच स्थिर होणार आहे.कारण औरंगाबाद शहर ऑटो मोबाईल क्षेत्रातील प्रगती पथावर असलेलं शहर आहे अन् हे तो ही वेळोवेळी हे सांगत होताच..!
पुढे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याला विचारले असता कळले की तो या किंवा याशी जोडलेल्या व्यवसायात वयाच्या सोळाव्या वर्षी पडला अन् तो अशिक्षित आहे.फक्त थोडीफार इंग्लिश भाषेची त्याला असलेली ओळख अन् रोजच्या आयुष्यात लागणारी गणितं त्याला जमतात अन् या जोरावर तो आपल्या अनुभवाला घेऊन व्यवसायानिमित्त संपूर्ण देशभरात फिरत असतो..!
तो इतका सर्व फिरता असल्यामुळे तो मनकवडा ही असावा कदाचित कारण आपल्या बोलण्यातून आपल्याला काय बोलायचं आहे,आपला सूर बोलण्यातून कुठे जातो आहे हे त्याला सहज कळायचं.त्याच्या व्यवसायाबद्दल अन् वैयक्तिक आयुष्याबद्दल तो भरभरून बोलत होता मी ऐकत होतो..!
संपूर्ण भारतात फिरून त्याने पंजाबी,बंगाली,तामिळी,उर्दू,केरळी भाषासुद्धा बोलायला शिकून घेतल्या होत्या अन् आता बऱ्यापैकी मराठीसुद्धा तो बोलायला शिकलेला होता.हे बघून खरच त्याच्याबद्दल मनात आदर काही पट जेव्हा तो आला त्यानंतर वाढला होता..!
आपण नेहमीच तक्रारी करत असतो हे असे नाही तसे हवे किंवा हे शक्य नाही ते करू,असं तो काहीही बोलत नव्हता..!
तो फक्त म्हणायचा मेहनत करो और किसी भी काम को दिलसे करो,काम हो जायेंगा..!
पढे लिखे लोग भी मेहनत करते हैं खाली काममे थोडा बहुत फरक होता हैं,लेकीन मेहनत तो होती ही हैं ना..!
पुढे खूप गप्पा झाल्या तारुण्यातील त्याच्या आठवणींना त्याने उजाळा दिला,सोबतच लॉकडाऊनचा काळ त्याच्या आयुष्यातील किती वाईट काळ होता हे ही त्यानं सांगितलं.एका छोट्याश्या चुकीमुळे त्याच्यावर रेल्वे पोलिसांनी केलेली केस अन् त्या केससाठी त्याला एक वर्ष शोधत फिरणारे पोलिस पुढे तो त्यांना भेटला दीड वर्ष केस चालली कोर्ट,पोलिस पुढे शिक्षा,दंड भरून तो सुटला अन् एका चुकीमुळे ऐन उमेदीचे दीड वर्ष आपल्या हातातून सुटून गेले याचं त्याला झालेलं दुःख तो सांगत होता..!
तो बोलत होता मी ऐकत होता,कधी त्याच्या जागेवर मला ठेवून बघत होतो तर कधी मी इतका शिकूनही मी असा विचार का केला नाही हा ही विचार करत होतो.घड्याळीत रात्रीचा एक-सव्वा कधी वाजला कळलाच नाही,गप्पा चालू होत्या त्या आवरत्या घेतल्या अन् त्याच्या उद्याचा कामाचा बिझी शेड्युल बघून त्याला झोपायला म्हणून सांगितले अन् मी ही झोपलो.ते सर्व विचार डोक्यात चालूच होते,कधीतरी आपण आयुष्याकडे खूपच अपेक्षा करतो की काय असे मला वाटायला लागले होते..!
तो सकाळी साडेपाचला उठला समोरच्या व्यक्तीला फोन लावला कदाचित त्याला बोलावणं आलं असावं,कंपनीतून काही पार्टस घ्यायचे होते त्याची प्रोसेस करण्यासाठी तो सकाळीच आवरून औद्योगिक वसाहतीकडे निघूनही गेला.निघतांना म्हंटला की मिलेंगे तुम्हारे शहर आये तो कभी,आज श्याम फिर कलकत्ता जो जाना हैं..!
काय बोलावं मी निःशब्द होतो,त्याला नंबर दिला अन् तो पुढील प्रवासाला लागला..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा