आक्काच्या सुमीचं बाळंतपण..!
कालच्या दै."सकाळ" वृत्तपत्रात संपूर्ण मराठवाडा आवृत्तीमध्ये "मैफल" या सदरात माझी "आक्काच्या सूमीचं बाळंतपण" ही कथा प्रसिद्ध झाली आहे..!
मनस्वी खूप खूप धन्यवाद..!
Vikas Deshmukh सर,
दै.सकाळ मिडिया समुह,औरंगाबाद..!
शीर्षक:आक्काच्या सुमीचं बाळंतपण..!
थंडीचे दिवस सुरू होवून महिना-दोन महिने उलटले होते आणि आता कडाक्याची थंडी रातच्याला जाणवायला लागली होती.गावात सांच्याला जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात होत्या,सांज सरायला लागली की थंडीचे शरीराला बोचण्याचे काम सुरू होत असायचं....
दिवसभर राखोळीला असलेल्या गावातल्या बकऱ्यांना वळून-वळून मी दमून गेलो होतो.सांच्याला बकऱ्या दावणीला बांधून,मोरीत म्या हातपाय धुतले अन् एकाकीच थंडीमुळे मला हुडहुडी भरून आली.मायना चुल्हीवर कोरा चहा उकळायला ठेवला होता,अंगात हुडहुडी भरून आल्यानं मी चुल्हीपाशी जावून तिच्या लालबुंध झालेल्या निखाऱ्याला ताटलीनं अलिकडं ओढून शेकत बसलो होतो..!
कडाक्याच्या थंडीमुळे चुल्हीजवळ छान वाटत होत,मायच्या भाकरी थापून झाल्या होत्या,पिठलं चुल्हीच्या एकांगाला रटारट आळत होतं,चहा उकळली अन् म्या ती सांडशित धरून गिल्लासामधी वतून पिवून घेतली अन् सावता माळ्याच्या देऊळापहूर असलेल्या पारावर जावून सवंगडीच्या संगतीने गप्पा झोडीत बसलो..!
काही घटकाभरच्याने येऊन मायना अन् म्या जेवण केलं अन् मोहरच्या अंगणात माय भांडी घासत बसली होती.शेजारच्या आक्काचे सांजेचं सगळी काम उरकली होती की काय म्हणून ती मायजवळ येऊन तिच्याशी गप्पा झोडीत बसली होती..!
मी जेवण करून थंडी असल्यानं चुल्हीच्या विझनार्या निखाऱ्याशी शेकत,खुप वेळापासून त्या चुलीच्या निखाऱ्याशी काडीनं खेळत बसलो होतो.माय भांडे ठेवायचं टोपलं घ्यायला आत आली,मला बघून ती बोलती झाल,येड्या खुळ्यागत इस्तवाशी काय खेळतोय..?
मी मग्न होतो विचारांमध्ये माझ्या..!
का..? तर विस्तवच माझ्या जगण्याचं वास्तव होतं,म्हणून कधी त्याची भिती नाही वाटली..!
आई पुन्हा घासलेले भांडे टोपल्यात ठेवून भांडे आत ठेऊन आक्काशी गप्पा मारायला बाहेर मोहरच्या अंगणात गेली.मी पण माझा विस्तवाचा खेळ बंद करून,चुल्हीला विझवून आता परसदारच्या अंगणात खाटेवर येऊन अंगावर पांघरून घेऊन झोपलो होतो.थंडी खुप वाजत होती,घरावरची पत्र सकाळच्या प्रहरी पडणाऱ्या दवांनी सादळली होती,गारठ्यानं ती अजुनच गारठून गेली होती,मातीने पोचारलेलं घर अजूनच गारठा धरत होतं..!
मी आता पहुडलो होतो,परसदरच्या मायच्या अन् आक्काच्या गप्पा कानी पडत होत्या.आक्का म्हणत होती,सुमी बाळंतपणाला (तिची लेक) येतिय्या,कालच्याला तिला आठवा महिना सरला होता.ती चार-पाच रोजा पहूर बाळंतपणाला माहेरी येणार हुती..!
आक्काचा नवरा मरून एक साल झालं होत अन् आता तिची लेक सुमी बाळंतपणाला तिच्याकडं येणार हुती.तिच्या बाळंतपणाची आक्काला चिंता नव्हती,चिंता होती ती आता तिला अन् बाळाला झोपायला लाकडी खाट करायची होती,ती कुणाकडून करून घ्यायाची हे तिला उमगत नव्हतं,ती मायला या बाबत विचारपुस करू लागली हुती...!
म्या ते ऐकत खाटेवर लोळत पडलो होतो..!
खाट तयार केली तर ती विणायला तिला येईना झाली होती, याचं संमध टेन्शन आक्काच्या चेहऱ्यावर दिसत हुतं.उद्या लेक बाळंतीण झाली अन् जावई लेकराला पाहायला आला,खाट नसली तर त्यो काय म्हणल,त्यो मला झिडक्या देईल..!
तुझ्या मायला काय खाट करायला झापली नाही काय..!
असं बोल सुमीच्या लागून मला देईल..
पैका असतांनाही आक्काची अवस्था खूप वाईट झाली हुती,कारण बाहेरची दुनिया आक्काच्या ओळखीची नव्हती अन् विधवा बाई म्हंटलं की लोकांना फक्त एक संधी वाटते.आक्काच्या मनात विचारांचं काहूर माजलं होते..!
वेळ फार झाली,माझेही पाय दिवसभर रानात शेपुड्यामागे हिंडून-हिंडून दुःखत होते,आता डोळे लागायला लागले होते.आक्का अन् माय हरिपाठ घेऊन आक्का तिच्या घरला झोपायला गेली अन् माय कडीकोंडा लावून आत झोपायला आली.एरवी मी पण झोपी गेलो हुतो,मायना माझ्या अंगावर पुन्हा पांघरून टाकलं अन् माय धरणीला अंथरूण टाकून झोपली..!
झोपल्या-झोपल्या माय काहीतरी पुटपुट करत होती,तिला पण तिच्या लेकीच बाळंतपण आठवलं असावं.तिची तिच्या लेकीच्या बाळंतपणाला खाटीसाठी झालेली फजिती मायला आठवत होती,ते सर्व आठवून माय टिपूस गाळत होती..!
पहाठी मी लवकरच उठलो,बकऱ्यांची पिल्लं प्यायला सोडली अन् मधल्या दाराच्या चौकटीवर बसून मायला बोलो..!
मायव सुमीच्या बाळंतपणाला आपली ही खाट आक्काला दे,गरीब हाय बिच्चारी आक्का..!
आई माझ्याकडे निरखून पाहायला लागली..!
मी पुन्हा बोलता झालो,मायव ताईच्या बाळंतपणाला खाटीसाठी झालेली तुझी आबळ याद हाय मला..!
रातच्याला म्या तुमचं बोलणं ऐकलं,देऊन टाक माय आक्काला आपली खाट..!
माय माझ्याकडं बघून बोलू लागली गरीबीच्या जगरहाटीत जगायला शिकलं माझं कोकरू अन् नकळत मायच्या डोळ्यांतून अश्रुंनी मोकळ्या वाटा करून दिल्या,मायला बघून मला गलबलून आलं अन् तिला पाहून मी पण आसवांचा बांध फोडला,माय मला छातीशी घट्ट कवटाळून रडायला लागली.
तिचा लेक शहाणा झाला याची तिला जाणीव झाली होती अन् तो आनंद तिच्या या आसवांतून ओसंडून वाहत होता..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा