माई एक पर्व..! 💙
साधारण दुसऱ्या लॉकडाऊनमधील ही गोष्ट असावी,माझं ऑनलाईन कॉलेज चालू होते अन् या काळात मी जॉब सोडला होता तसा अजूनही सोडलाच आहे.नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाले,अभ्यास झाला अन् मी आणि आई टीव्ही बघत बसलो होतो..!
टीव्हीवर चॅनल बदलत असतांना आईला "सिंधूताई सपकाळ" यांच्या भूमिकेतील अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" बघितली अन् आईने मला ते चॅनल पुन्हा लावायला सांगितले, लावलं अन् त्या चॅनलवर "मी सिंधूताई सपकाळ" हा चित्रपट चालू होता.
एरवी सध्या घरी फक्त मी अन् आईच असल्यामुळे आम्ही रोज सायंकाळी जेवण झाले की यु-ट्यूबवर भजन,कीर्तन,कविता,व्याख्यान ऐकत बसलेलो असतो..!
अलिकडे आईला त्या एक विचारसरणी असलेल्या टीव्हीवरील सिरियल बघायला आवडत नाही,म्हणून मग आम्ही सायंकाळी ठरलेल्या वेळेत मोबाईलवर वरील सर्व गोष्टी बघत,ऐकत असतो..!
एक दिवस सहज यु-ट्यूबवर स्क्रोल करतांना आईनं "सिंधूताई सपकाळ" (माई) यांचा जीवनसंघर्ष,स्मशानात प्रेतावर भाजलेली भाकर अन् तो सर्व खडतर प्रवास बघितला.त्यापूर्वी आई माईबद्दल जाणून होती पण आईच्या आयुष्यात गेले काही वर्ष सोडले तर तिला कामातून उसंत नव्हता.त्यामुळे आईही किती जाणून असणार माईबद्दल,त्या दिवशी आईने अन् मी तो काही मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण बघितला अन् आईला आईचा संघर्षमय जीवन प्रवास आठवला..!
त्याही दिवशी आईनं अन् मी,होय मी (मी कधीही चित्रपट बघत नाही) पण तो संपूर्ण दोन-अडीच तासांचा चित्रपट बघितला.अन् तो बघून झाल्यावर आई मला बोलती झाली की तुझे बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा मी बापाविना पोरके झालेल्या मुलांचा सांभाळ केला,माझं कर्तव्य पार पाडले.माईसारखाच पण माई इतका नाही पण काही अंशी आयुष्यात संघर्ष केला अन् हे मला सांगणे नको होते कारण त्या संघर्षात आम्ही तिघे भाऊ-बहीण आईच्या नेहमीच सोबत होतो..!
आई पुढे बोलली मी तुम्हाला इतकं शिकवलं,आज आपल्या घराण्यात सर्वाधिक शिकलेला तू आहेस अन् हे खरे आहे. तर माझा इतकासा संघर्ष परंतू मायीनं तर तिच्या आयुष्यात आयुष्यभर संघर्ष केला.पुढे हजारो अनाथ मुलांची माई आई झाली,त्यांना शिक्षण दिले त्यांना योग्य मार्गाला लावले,अनेक मुलींना शिकवले त्यांचे संसार फुलवले अन् मायी खऱ्या अर्थानं हजारो अनाथ मुलामुलींची आई झाली..!
पुढे आई बोलती झाली की माईला एकदा भेटायचं आहे आयुष्यात अन् ती भेट तू घडवून देशील..!
कारण माईची मुलगी "ममताताई" कविता करते हे मी आईला सांगितले होते.खूपवेळा आईला मी ममताताईच्या कविता ऐकवल्या,वाचून दाखवल्या होत्या.दोघी मायलेकीच्या एफबीवरील पोस्ट मी आईला नेहमी दाखवत असल्यानं आई हे सर्व जाणून होती.मलाही माईचा हा प्रवास बघून भेटण्याची इच्छा होतीच..!
पण काल साधारण याच वेळेला टीव्ही बघत असतांनाच न्यूजवर एकाकीच माई आपल्याला कायमची सोडून गेली हे कळलं.आईला काय सांगावं कळत नव्हतं खूप जड अंःतकरणाने आईला सांगितले आई माई सोडून गेली,मला आईनं काय बोलावं..!
आई फक्त शांत बसून होती अन् माईचा तो जीवनप्रवास जो ग्राफिटीच्या माध्यमातून वाचत,बघत बसली होती.शेवट आई एकच वाक्य बोलली
माईला भेटायचं राहून गेलं रे आपलं बेटा,भेटायला हवं होतं आपण..!
मी काय बोलावं सुचत नव्हतं..!
माई कायम आठवणीत असशील..! 💙
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा