त्या दोघी..!
सर्वत्र रात्रीचा काळोख पसरला आहे,रात्रीची थंडी अंगावर येते आहे अन् एकाकीच साडेबाराच्या ठोक्याला तिचा आवाज कानी पडतो अन् त्या दोघींची भांडणे चालू असेल का..? की दोघी दारू प्यायला असतील म्हणून इतक्या मोठ्या आवाजात शिव्या देत त्या कचाकच भांडत आहेत,असतील.
अलीकडे म्हणजे बहुत दिवसांपूर्वी कळलं त्या जगण्यासाठी कुठल्याही हद्दीला जावू शकता,दिवसभर त्या मिळेल ते काम करत असतात.शेजारच्या परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करून त्या भंगारवाल्याला विकून त्याचा पैसा करता अन् काहीतरी आणून खातात.त्यांच्या झोपडीची चूल कधीच मला विस्तवाने जळताना दिसली नाही,कधीतरी काही हाती लागलं नाही की शेजारीच असलेल्या नाल्यात एक फाटकी साडी त्यांनी मासे पकडायच्या जाळ्याप्रमाणे लावून दिलेली आहे,वेळोवळी त्या जाळ्यात जे काही मासे,पानकोंबड्या,खेकडे येतात पहाटीच धुंडाळून त्या ते आणून भाजून खावून घेतात..!
कधीतरी अंघोळ करावी वाटली तर त्या पाण्यातच तीही करून घेता,एकांगाला असल्यानं तिकडं कुणी भटकतही नाही पण त्यांचा असा आवाज आला की काळीज चिरत जाते.कारण मग त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत एकमेकांना मारताही तर कधी आनंदी असल्या की दारूच्या नशेत नाचताही.त्यांनी पाळलेली कुत्रे सतत त्यांच्या चौफेर फिरत असतात,त्यामुळे त्यांना चोर किंवा कुणी येईल मारेल किंवा काही विचित्र वागेल याचं भय नसावं अन् कदाचित त्या तितक्या शुद्धीतही नसतात.आता मोठ्यानं ओरडू लागल्या आहे,त्यांच्या आवाजात सुर मिळवून त्यांचे कुत्रेही इवळत मोठमोठ्याने भुंकत आहे..!
त्या कोण असतील..? त्यांचं नातं काय असावं..? हे आजवर कळलं नाही किंवा मी ते जाणून घेण्यासही उत्सुक नव्हतो.कधीतरी त्या दोघींचे नाते मला आई अन् मुलीचे वाटते तर कधीतरी सासू सूनेचे तर कधी त्या म्हाताऱ्या बाईने ती पस्तिशीतील बाई शोधली अन् त्या एकमेकींच्या आधारे आपलं जीवन जगता आहेत असं वाटायला लागतं...!
परंतु असाच एक पन्नाशीतील पुरुष तिथं दिवसभर गरक्या घालत असतो,त्याला लहानपणापासून बघतो त्यामुळं तो जरा ओळखीचा वाटतो.पूर्वी एका सधन घरात तो कामाला होता पण कसा काय माहित नाही पण एक दिवस त्याचा पाय तुटला अन् वॉकरच्या आधाराने तो या दोघीजवळ आला.त्यांनीही कुणी जवळचा असावा अश्याप्रकारे त्याला Accept केले अन् आता तो बऱ्यापैकी चांगला झाला आहे..!
त्यांच्या कामात त्यांना मदत करतो,प्यायला पाणी भरून ठेवतो,त्यांचं अंथरूण पांघरूण रोज त्या बेसमिट असलेल्या ठिकाणी वाळवत घालतो.कधीतरी वाटतं की यांनी त्याला आधार दिला म्हणून तो यांची कामे करतो कदाचित असं असावं.दोघीत भांडणे होत असले की तो त्यांना समजावून पण सांगतो,तो दारू पित नाही अन् तो खूप मेहनती आहे..!
त्याला लहानपणापासून मी बघतो पूर्वी ज्या ठिकाणी तो राहायचा त्या परिसरात नळ आलेले नसल्याकारणाने त्याला कित्येकदा मी आमच्या घराच्याजवळ असलेल्या फिल्टरवरून पाणी भरलेल्या क्यानी लोटगाडीवर लोटत घेऊन जाताना बघितले.नंतर या दोघींची झालेली भेट किंवा पूर्वीचेच यांचे काही नाते आहे का हे सर्व अलबेल आहे पण तो दिवसभर तिथे असतो.मावळतीला कुठे निघून जातो नजरी पडत नाही.तेच सकाळी पाण्याला हंडा घेऊन पळत पळत जाताना दिसतो,तिथे असला की तो नेहमीच पळत असतो,पळत कामे करत असतो.का तेही माहित नाही..!
आत्ताही त्या भांडत आहे कदाचित आज त्या खूप प्यायल्या आहेत,एकमेकांना शिव्या देत आहेत.चूल नेहमीप्रमाणे आजही पेटलेली दिसत नाही,तो इसमही आज दिसेना झालाय.त्यांची कुत्रेही मोठ्याने भुंकत आहे जसे काहीतरी होते आहे पण हे नेहमीचेच असल्यानं त्यांना कुणी बघत नाही,दुर्लक्ष करतात..!
त्या दोघी राहायला एक सारख्या असतात कधीतरी अंघोळ केलेल्या,त्यांचे ते विस्कटलेले केस अन् आमच्या परिसरात आल्या की माझे मग त्यांना जवळून निरखने होते.तेव्हा त्या खूप भरभर बाटल्या गोळा करताना दिसत असतात,तर कधी लाकडे पण त्या कधीच कुणाला खायला मागत नाही किंवा दिले तरी त्या घेत नाही असं का हे ही आजवर कळले नाही..!
त्यांच्याजवळ असलेल्या कुत्र्यांना मात्र त्या पोटच्या पोराला जपावं तसे जपतात त्यातील पस्तिशीतील त्या बाईला कुत्र्यांचा खूपच लळा आहे अन् त्यामुळे ती कुठेही गेली की तिची दोन-तीन कुत्रे ती आगेमागे असतातच.ती पण वेळ असला की त्यांच्याशी खेळत बसते,त्यांना मिठीत घेते,त्यांच्याशी संवाद साधते दारू प्यायली असली की त्यांना घेऊन नाचत असते...!
काही काही समजत नाही त्या दोघींचे पण त्या त्यांच्या या विश्वात खुश असतात.जरी रात्री भांडणे झाले तरी सकाळी सोबत काम त्या दोघी काम करतांना दिसतात.खूप प्रश्न आहे त्यांच्या बाबतीत खूपवेळा विचार केला विचारावं त्यांना पण हिम्मत नाही झाली कधी.कारण माझ्या प्रश्नांनी त्यांना त्रास झाला तर मग काय..? त्यामुळे टाळतो तूर्तच तरी...!
अजूनही भांडत आहेत त्या दोघी बरे काय बोलत असतात फारसे कळतही नाही त्यांचे बोलणे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा