आयुष्य आणि वळणं..!
सकाळ सरून दुपारचं आभाळ विंडोग्रीलला असलेल्या पडद्याआडून घराच्या आत येतं अन् त्याच्या बरोबर एक अनामिक हुरहुर घराच्या आत येऊन जाते की काय असा भास व्हायला लागतो.भूतकाळ आठवणींचा होतो,वर्तमान काळ भविष्यकाळातील चिंताना घेऊन आणि विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या भूतकाळातील आठवणींना मग मन उजाळा देऊ लागते..!
ऑफिसच्या आठवणी,आठवांचा तो काळ धूसर होवून आठवू लागतो.सध्यास्थितीत जगत असलेल्या आयुष्याला घेऊन मग कारणे शोधली जातात अन् आयुष्यात वेळोवेळी आलेलं रिकामपण किती खायला उठतं याचा प्रत्यय येतो.दिवसभरातून कित्येकदा आयुष्याची गणितं जुळवून बघितली जातात,कित्येकदा तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाला हुलकावणी देऊन जाणारे क्षण आठवून मग टिपूस गाळणं होतं..!
कारण जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर आपलं वय आपल्याला हुलकावणी द्यायला लागतं,तेव्हा आयुष्यात सर्व गोष्टींना घेऊन स्थिर होणे या अवस्थेचा अर्थ आपल्याला कळायला लागतो..! अन् जेव्हा हा अर्थ अन् त्याच्या बरोबरीने आपल्या आयुष्याची गणितं आपण जुळवू बघत असतो तेव्हा आपल्या आयुष्याला घेऊन आपल्या हाताने किंवा काही इतर कारणास्तव विस्कळीत केलेला भूतकाळ आपल्याला आठवायला लागतो. मग विस्कळीत झालेलं आपलं भवितव्य,ठोकरा खात जगत असलेलं आपलं भविष्य आपल्याला दिसते..!
मुळातच आयुष्याला घेऊन "वेळ" या कधीही न थांबणाऱ्या गोष्टीला घेऊन आपण जीवनाकडे बघू लागतो,तेव्हा बरीच गणितं विस्कळीत झालेली असतात किंवा जन्म मरणाच्या या ट्रॅकवर आपल्या योग्य सूत्रांचा आधार घेऊन ही गणितं वेळीतच सोडवावी लागतात.
अलीकडे ही गणितं सोडतांना बऱ्याचदा तडजोड जाणवत असते पण तारुण्याच्या उंबरठ्यावर हुलकावणी देणारं वय बघितले की शेवटच्या दहा मिनिटाला जसा पेपर सोडवण्यासाठी जशी आपली तडजोड असते तशी या वयात अनुभवायला मिळते आहे..!
बघुयात कारण आयुष्याचा हा पेपर सोडवताना अंताला काहीही महत्त्व नाहीये कारण अंत हा सर्वांचा होणारच असतो.कारण आयुष्यात एक उंचीला जो असतो अन् जो आयुष्यातून आयुष्य जगत असतांनाच उठून गेलेला असतो त्यालाही अंत असतो.म्हणुन तारुण्याच्या उंबरठ्यावर जे काही साधता येईल त्याचाच हिशोब आयुष्यभर होत असतो अन् त्याची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज करत आपण हे आयुष्य जगत असतो.
अंतक्षणी मग कधीतरी खुप काही हाती राहवून आपण जग सोडून जातो तर कधीतरी काहीही न राखून जसे आलो तसे निघून जातो आयुष्याला घेऊन अर्थ या दोन्ही गोष्टींना नाहीये.परंतू आपण मानवाने जगण्याला प्रमाण लावलं आहे अन् त्या प्रमाणात आपल्याला उतरायला हवं नाही तर जगण्याला अर्थ नाही...!
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा